हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
×

कोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित

उत्पादन उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी औषधे आणि जीवनदायी औषधे यांची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची संपुर्ण मालकी असलेली आणि कंपनी अधिनियम 1956 खाली नोंदणी केलेली आणि परळ, मुंबई या ठिकाणी असलेली हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित ही कंपनी स्थापन करण्यात आली.

कंपनीच्या संस्थापन नियमावलीखाली महाराष्ट्राच्या राज्यपालांना कंपनीच्या मंडळावर सर्व संचालकांना नियुक्त करण्याचे सामर्थ्य प्रदान करण्यात आले आहे.

हाफकिन अजिंठा औषध निर्माण मर्यादित, ही हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित या कंपनीची उपकंपनी आहे आणि ती 1977 साली स्थापन करण्यात आली. महामंडळाने घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, क्षय, पोलिओ आणि रेबीज या रोगां विरुध्द जिवाणुजन्य आणि विषाणुजन्य लसींचा व्यापक वैविध्याच्या विकासात आणि उत्पादनात अग्रगण्य भुमिका बजावली.

महामंडळ फार्मास्युटीकल उत्पादने, जंतुनाशके, मलमे, इंजेक्शन्स, सिरप आणि मिश्रणे देखील तयार करते. हाफकिनचा प्रतिविष व रक्तजल विभाग पुण्याजवळ पिंपरी येथे आहे आणि तो धनुर्वात, घटसर्प, कोथ, साप आणि विंचु विषविरोधी प्रतिरक्तलस यांचे उत्पादन करतो. या विभागाची 1940 साली साप विषविरोधी रक्त लस तयार करण्यासाठी स्थापना करण्यात आली आणि नंतर तो विभाग 1952-53 साली चरणबध्द रीतीने पिंपरीत स्थलांतरीत करण्यात आला. विषप्रतिकारक आणि रक्तलस विभाग 75 एकर जमीनीवर कार्यरत आहे आणि व्यवस्थापक त्याचे प्रमुख आहेत, त्यांना विविध तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी मदत करतात. सध्या या विभागातील कर्मचाऱ्यांची एकुण संख्या 170 आहे. विविध प्रतिरक्तलसींचे उत्पादन करण्यासाठी सुमारे 850 घोडे देखील सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित प्रतिरक्तलस अगदी कमी आणि परवडणाज्या किंमतीत तयार करते आणि ती मुख्यतः अनेक राज्यांच्या आणि केंद्र सरकारच्या संस्थाना, त्यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संस्थाचा समावेश आहे, पुरवली जाते.

सर्व प्रतिरक्तलसी क्रमाक्रमाने वाढवण्यात येणाऱ्या प्रतिजनाची (व्हेनोम / विष) मात्रेचे अंतःक्षेपणच्या साह्याने घोड्यांना अतिप्रतिक्षमित करुन 6 ते 8 महिन्यात तयार केल्या जातात. घोड्यांनी प्रतिजनाच्या विरुध्द विशिष्ट क्षमता एकदा प्राप्त केली की प्रत्येक महिन्यात घोड्यापासुन प्रतिरक्त गोठणवणुक द्रावणात रक्त गोळा केले जाते आणि संपुर्ण रात्र रक्त तसेच ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी रक्तद्रव अलग केले जाते आणि तांबड्या रक्तपेशी पुन्हा एकदा घोड्यांच्या शरिरात निवेशीत केले जाते (प्लाझमाफेरीसीस). विनिर्दिष्ट प्रतिक्षम नत्रप्रचुर द्रव्य समाविष्ट असलेल्या आणि अलग केलेल्या रक्तद्रवावर नंतर विकर डायजेशन आणि रासायनीक क्रिया यांच्या सहाय्याने प्रतिक्षम नत्रप्रचुर द्रव्य प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. रक्त लसीची सुरक्षा आणि क्षमता यांची उंदरावर चाचणी घेतली जाते आणि नंतर वितरणासाठी पात्रात ठेवले जाते. जागतिक आरोग्य संघटना आणि जीएमपी यांच्या मानकाशी अनुरुप प्रशुष्कन प्रकल्प 2002 साली सुरु करण्यात आला आणि आता तो प्रतिरक्त लसीच्या प्रशीत शुष्कनासाठी वापरला जातो. घोडे (घोडे / खेचर / निम्नप्रजातीचे घोडे) यांचा वापर गेल्या शंभर वर्षापासुन अतिप्रतिक्षमित रक्तलस तयार करण्यासाठी केला जातो आणि हाताळण्यातील सुलभता सह्यता, वारंवार देण्यात येणाज्या प्रतिजनाची उच्च मात्रा सहन करण्याची क्षमता, कालबध्द मध्यांतरानंतर रक्त मोठ्या प्रमाणात तयार करण्याची क्षमता यासारख्या काही विशिष्ट फायद्यामुळे या प्राण्याची निवड अगदी स्वाभाविक आहे. एच.बी.पी.सी.एल.साठी भारतीय लष्कर हा घोड्यांचा आणि खेचरांचा मुख्य स्त्रोत आहे, तर निम्न प्रजातीचे घोडे स्थानिक पातळीवर खुल्या बाजारात खरेदी केले जातात. सध्या 850 घोडे आहेत, तथापी एटीएसने पुर्वी 800 पर्यंत घोडे ठेवले होते.

एच.बी.पी.सी.एल ही भारतातील प्रतिसर्प विष रक्तलसीच्या उत्पादनात अग्रेसर आहे आणि सदर कंपनी 1940 सालापासुन त्याचे उत्पादन करते. एच.बी.पी.सी.एल  ने देशात 1945 सालापासुन प्रशुष्कीत प्रतिसर्प विष रक्तलसीच्या उत्पादनाचा देखील प्रारंभ केला. पुर्वी सदर कंपनी प्रतिसर्प विष रक्तलसीची देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी होती आणि ती देशातील एकुण उत्पादनाच्या 60 ते 70 % उत्पादन करीत होती. एच.बी.पी.सी.एल  कंपनीने तयार केलेल्या प्रतिसर्प रक्तलसीची जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या मार्फत निर्यात केली जाते.

1997 साली सदर कंपनीने भारतात प्रथमच विंचूदंश प्रतिविष लसीच्या  उत्पादनाचा यशस्वी प्रारंभ केला, कोकण प्रदेशातील प्रदिर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पुर्ण करणे या विनिर्दिष्ट हेतुसाठी सदर उत्पादन विकसीत करण्यात आले. सध्या एच.बी.पी.सी.एल ही कंपनी सदर प्रतिरक्तलसीची देशातील एकमेव उत्पादक आहे. 1995 सालानंतर एटीएस विभागाने स्वतःचे सर्पालय सुस्थितीत ठेवला आहे, त्याठिकाणी भारतातील तीन प्रमुख विषारी सर्प, म्हणजेच नाग, रसेल साप, अतिविषारी नागाच्या प्रजातीचा साप ठेवण्यात आले आहेत. त्यांचा वापर गरजेनुसार घोड्यांच्या अतिप्रतिक्षमतेसाठी विष तयार करण्याच्या उद्देशाने केला जातो. ही सुविधा म्हणजे पिंपरी येथील विष प्रतिकारक पदार्थ आणि रक्तलस विभागात तयार करण्यात आलेल्या प्रतिसर्प विष रक्तलसीची गुणवत्ता आणि क्षमता कायम ठेवण्यासाठी वरदानच आहे. प्रति रेबीज रक्तलस जरी एच.बी.पी.सी.एल  साठी नवीन नसली तरी एटीएस विभाग तिचे उत्पादन करीत आहे. बऱ्याच काळापासुन, म्हणजे 1995 सालापासुन तिचे उत्पादन होत नसले तरी प्रति रेबीज रक्तलस पुन्हा सुरु करणे विचारात घेणे राष्ट्रीय गरजांशी सुसंगत आहे असे भारत सरकारच्या आरोग्य प्राधिकाज्यांचे निरिक्षण आहे. पिंपरी येथे तयार करण्यात आलेली सर्व उत्पादने मुंबईला पणनासाठी पाठवण्यात येतात. हाफकिन अजिंठा फार्मास्युटीकल्स मर्यादित हाफकीन अजिंठा औषध निर्माण मर्यादित ही हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित या कंपनीची उपकंपनी आहे आणि सदर उपकंपनीचा जळगाव येथे असलेला कारखाना आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि त्यामध्ये टॅबलेटस, कॅपस्युल्स, मलमे, चूर्ण आणि विलेपने तयार केली जातात आणि मुख्यतः त्याचा महाराष्ट्र शासनाची रुग्णालये / संस्था यांना पुरवठा केला जातो.

खास कार्य

मानवजातीला आरोग्य सेवा पुरवणे.

ध्येय

उच्च गुणवत्ता असलेली आरोग्य सेवा क्षेत्रातील उत्पादने तयार करणे आणि वाजवी किंमतीत त्यांचा पुरवठा करणे.

उद्दीष्ट्ये

  • समाजाच्या गरजेनुसार उच्च गुणवत्तेच्या लसी, रक्तलसी, आणि जीवनदायी औषधे उत्पादित करणे आणि त्याचा वेळेत पुरवठा करणे.
  • तंत्रज्ञान आणि जीएमपी यांची सातत्याने श्रेणी वाढ करणे.
  • स्पर्धात्मक प्रभुत्व विकसित करणे आणि कायम ठेवणे.
  • कर्मचाऱ्यांची प्रेरणा आणि बांधिलकी यांची उच्च पातळी कायम ठेवणे.
  • कंपनीचा व्यवसाय आणि व्यवहार यांचे स्वयंपूर्ण पध्दतीने व्यवस्थापन करणे.
  • सामाजिक दायित्वे कार्य प्रभावीपणे पार पाडुन गुंतवणुकीवर परतावा मिळवण्याची हमी निर्माण करणे.